पावसाच्या सरींमध्ये
डबक्यातल पाणी छप छप उडवत
स्वतःच्या वाटचालीचे शिंतोडे,चिखलाचे डाग
पॅन्ट वर जमा करत चालला आहे
भिजलाय अगदी चिंब वगैरे..
मनात स्वप्न रंगावतोय स्ट्रॉंग कॉफीची
आणि त्या स्पेशल भेटीची
थंडीने कुडकूडतोय
थंड श्वास घेऊन गरम उच्छवास सोडतोय
उंच उंच सागाच्या, बांबूच्या झाडातली
निमुळती वाट पार करतोय
कानात गुंजणाऱ्या मंद सुरांना
त्या अरण्यात निसटून जाऊ देतोय
खिशातली ती गुलकंदी गोड चिठ्ठी भिजू नये
म्हणून एक हात खिशातच मुठ बांधून ठेवतोय
कडकडणाऱ्या विजांनी जरा थबकतोय
आणि मग पुन्हा चालू लागतोय
पाण्याचे ओघळ चष्म्याच्या काचांवर येत आहेत
गरम श्वासातल्या वाफा पण
काचेचा आश्रय घेत आहेत
अश्या वेळी दुसऱ्या हाताने ओघळ पुसतोय
आणि अंधुक झालेला रस्ता पुन्हा त्याला दिसतोय
मनातल्या मनात तो त्या रोस्ट केलेल्या
कॉफी बीन्स चा गंध आठवतोय..
अश्या वेळी हा गंध त्या मातीच्या गंधात मिसळतोय
कॉफी बनवणाऱ्या तिच्या मनात हा दरवळतोय..
आडोश्यात असून सुध्दा तिला चिंब भिजवतोय
खिशातल्या चिठ्ठीवर अनेक वळ उमटले आहेत
आणि त्यात अनेक वचने मात्र नाहकच मिटली आहेत
एक जिप्सी मनातला स्वप्नांच्या रानात भटकतोय
प्रेमाच्या स्वप्नसरीने चिंब चिंब भिजतोय...!
– अचलेय
(0८-जानेवारी-२०१८)