Wednesday, 9 December 2020

म्हणून, तुझ्या प्रेमात पडायचं आहे..

 एकाट ओल्या निर्जन काळ्या 

उकार किंवा वेलांटी सारख्या रस्त्यावरून

जिप्सी पळवत संध्येचा पाठलाग करत

गुलमोहराचा सडा उधळत 

किर्रर्र रानाच्या कुशीतलं 

माझं टुमदार घर गाठायचंय

कारण तिथे तू माझी 

वाट पाहत असशील..

कदाचित त्या गुलमोहरी

रस्त्याच्या टोकावर 

क्षितिजाची दुलई ओढणाऱ्या

सूर्याचं आणि त्या दृश्याच

चित्र रेखाटत बसली असशील..

तू रेखाटलेलं ते चित्र मला बघायचंय

आणि म्हणून मला 

तुझ्या प्रेमात पडायचंय

पक्ष्यांच्या चिवचिवाटात

गर्द राईत पाण्यावर

विसावणार्या तहानलेल्या

तांबूस रवी किरणांचे 

तुझ्या चेहेऱ्यावर पडलेले प्रतिबिंब 

तळ्याला मिठी मारणाऱ्या

झाडाच्या फांदीवर बसून

तासंतास तुझ्याशी गप्पा मारताना

पायांना स्पर्शून जाणाऱ्या 

त्या संथ गार पाण्यात पडलेल्या 

तुझ्या प्रतिबिंबात शोधायचंय

आणि म्हणून मला 

तुझ्या प्रेमात पडायचंय

कैक मैल चालून देखील

अपूर्ण राहिलेल्या तुझ्या गोष्टी

गरम कॉफीची चुस्की घेत घेत

ऐकायच्या आहेत

तुझ्या बालपणीच्या गमती जमती

जाणून घ्यायच्या आहेत

तुझ्या पहिल्या प्रेमाचा किस्सा

पण ऐकायचा आहे

तू रेखाटलेल्या चित्रांना निरखताना

त्यात दडलेल्या माझ्या कविता 

शोधायच्या आहेत

आणि म्हणून मला

तुझ्या प्रेमात पडायचंय.

रात्री निजताना 

माझ्या छातीचा किनारा 

व्यापून टाकणारा तुझा

मध्य रात्रीहून गडद केश सागर.

आणि त्या लहरींतून 

दरवळणारा गंध हा

त्या सागराला आटोक्यात 

आणण्यासाठी बांधलेल्या

मोगऱ्याची साखळी तुटल्याने

त्या सागरात खोल बुडाला आहे 

अश्या वेळी तो केसांत 

गुरफटलेला गजरा 

मला मोकळा करायचा आहे

आणि म्हणून मला

तुझ्या प्रेमात पडायचंय

        

                     ~ अचलेय

शालिग्राम

 धोंडा ओबड धोबड  होतो गोल गुळगुळीत  परी नदीत बुडणे  आले पाहिजे नशिबी  नदीचा तो तळ  तेथे प्रवाह अथांग  ध्यान लागता धोंड्यास  होतो त्याचा शालि...