Wednesday, 12 March 2025

पांघरूण

कधीतरी कोणीतरी मला विचारले होते की, “आज्जी च्या जुन्या सुती साड्यांचे पांघरुण (गोदड्या) का शिवून वापरतात, बाजारात मिळणाऱ्या पांघरुणांमध्ये काय उबदार पणा नसतो का ?”

तेव्हा मला सुचलेलं उत्तर आज या प्रसंगी अठवतय. ते असे की, “ऊब मिळते ना! पण ते वात्सल्य आणि त्या प्रेमाचा उबदारपणा नाही मिळत!!” 

पांघरूण हा शब्द पण किती चमत्कारिक आहे ना! 

शब्दशः जरी बघितलं तरी असा अर्थ उमगतो की ज्या ऋणात आपण गुरफटून गेलोय तरी पण ते हवे हवेसे वाटते असे वस्त्र म्हणजे ‘पांघरुण’!

आता हा लेख लिहिताना जाणवतय की मीरा आत्या बद्दल लिहिताना, शब्द गुंफताना माझी किती तारांबळ उडते आहे..!

काही नाते शब्दबद्ध करणे इतके कठीण आणि अशक्य असतात ना की जसे वेदांमध्ये परमेश्वरा बद्दल “नेती नेती” म्हणतात ना, तसे हे नाते आहे माझ्या साठी! व्यवहारिकरित्या माझं मीरा आत्या सोबत ‘द्वैत’ नातं होतं. बाबांकडून ती माझी ‘आत्या’ आणि आईकडून माझी ‘आज्जी’! 

पण हे सगळे असले तरी मला ती माझी ‘पुण्यातली आईच’ वाटत आली आहे.

माझ्या कॉलेज च्या दिवसांमध्ये किती तरी शनिवार आणि रविवार, मीरा आत्या च्या हातचे छान छान पदार्थ खायला मिळतील म्हणून मी तिच्या कडे आलोय. म्हणजे बाहेर कुठेही आपण जेवलो की त्यात जो एक ingrediant missing असतो ना, तो तिच्या पदार्थांमध्ये पुरेपूर असायचा. तो म्हणजे प्रेम आणि आपुलकी!

तब्येत बिघडली असता आणि अडीनडी च्या वेळी माझे हक्काचे ‘पांघरुण’ असायचे ते म्हणजे माझी मीरा आत्या!

आणि अश्या वेळी तिने मला कडवट काढे आणि तिच्या बटाव्यातले होमेपॅथी औषधे पण मायेच्या अधिकाराने, घ्यायला लावले आहेत.

तिच्या कॅन्सर च्या ट्रीटमेंटच्या वेळीची एक आठवण आज मला येथे उधृत करावी वाटते आहे. ती अशी की, मी तिला ज्युपिटर हॉस्पिटल च्या आयसीयू कक्षात भेटायला गेलो असताना तिनी ईतक्या यातना सहन करत असताना पण माझ्या नवीन लागलेल्या नोकरी बद्दल अभिनंदन केले.

तिचं हे निस्वार्थ प्रेम बघून डोळ्यात टचकन पाणी आले होते त्या वेळी!

खंत हीच वाटते की त्या नवीन नोकरी च्या नव्या व्यापात आणि नवीन अडचणींमुळे मला हवी तशी तिची सेवा नाही करता आली..!

मला लहानपणी एकदा माझ्या बाबांनी गमतीने सांगितले होते की जागतिक महिला दिन ८ मार्च ला असतो कारण त्या दिवशी मीरा आत्या चा वाढदिवस असतो आणि मला अजूनही तेच सत्य वाटते.

म्हणजे मीरा आत्याला ओळखणाऱ्या आम्हा सगळ्या मुला मुलींना तरी हे असे वाटूच शकते!

असो! या लेखला विराम देताना मला असे सांगावे वाटतेय की, जाता जाता ती आपल्या सगळ्यांना निस्वार्थ प्रेम कसे करावे आणि आनंदी जीवन कसे जगावे हे शिकवून गेली.

तिचे हे ‘पांघरुण’ मी आजन्म पांघरून राहणार आहे हे सांगून मी माझ्या वाणीस विराम देतो.

धन्यवाद !


~ नचिकेत अ. गद्रे

पांघरूण

कधीतरी कोणीतरी मला विचारले होते की, “आज्जी च्या जुन्या सुती साड्यांचे पांघरुण (गोदड्या) का शिवून वापरतात, बाजारात मिळणाऱ्या पांघरुणांमध्ये क...