Monday, 2 October 2017

गोष्ट आम्हा बुटांची

जन्म झाला आणि डब्यात पडलो
जुळे होतो, पण सारखे नाही
आता आमच्याच लेसने
आमचे गळे आवळले जाणार
या कल्पनेने आम्ही जरा धास्तावलोच होतो
एका सकाळी कुणी डबा उघडला
आम्ही झोपेत असतानाच आम्हाला पायात चढवला
आम्ही बाळूच्या पायात होतो
आजी, आत्या आमचं कौतुक करत होत्या
बाळू आम्हाला मिरवत होता
आणि आम्ही बाळूला "मिरवत" होतो
बाळू सोबत आम्ही शाळेस निघालो
नवीन रस्ता, ती सुंदर सकाळ
सगळं काही अनुभवू लागलो
बाळू तसा वात्रटच होता
चालता चालता डावा चिखलात बुचकाळला
मग मी उजवा खुदकन हसलो
कळण्याच्या आतच शेणात माखलो
मग दोघेही आम्ही शांत बसलो
आता आमचा दिनाक्रमच ठरला
रोज सकाळी आत्या काळं फासायची
ब्रशने चकाचक चमकवून टाकायची
 आम्हीपण ऐटीत "पादाक्रांत" व्हायचो
तुडवून घेण्यास सज्ज व्हायचो
पहाता पहाता दिवस लोटले
डावा उजवीकडून आणि मी डावीकडून पार झिजलो
माझ्या कपाळावर छिद्र पडलं
आणि चावट अंगठा डोकं काढू लागला
बाळूने घरी कुरबुर केली
आणि आम्ही पुन्हा एका डब्यात पडलो
मात्र हा डबा फार जीर्ण होता
भुताटकी झालेल्या घरासारखा वाटायचा
आम्हाला वाटलं की हातचं कामच गेलं
आपण आता बेरोजगार झालो
असेच काही दिवस गेले
आणि आमचा डबा कुठेतरी आदळला
झाकण उघडून प्रकाश आत आला
नि आम्ही खडबडून जागे झालो
आजूबाजूला बघतो तर काय
अनेक वस्तूंचे ढिगारे होते
जुन्या वस्तूंचे ते "आश्रमाच" असावे
आता दोघेही आम्ही आशेने बाहेर डोकावलो
येणा-जाणाऱ्याला हाक देऊ लागलो
तिथे बरीच मुलं जमायची
कुत्र्या-डुकरांना हाकलून वस्तू उचलायची
जेव्हा ढिगाऱ्याच्या वरती होतो
तेव्हा साध्या कुत्र्यानी नाही विचारलं
मग आम्ही पण कंटाळून जरा आत गेलो
आणि एके दिवशी आमचा "रेस्क्यू" झाला
मलब्यातनं आम्हाला सुखरूप काढलं गेलं
आम्हाला पुन्हा एकदा सोबती मिळाला होता
त्यानं माझ्या कपाळाची खोक शिवून घेतली
आज तो आम्हाला पायात चढवतो आहे
डाव्याच्या त्याने मुसक्या बांधल्या आहेत
म्हणून तो गप्प बसला
आणि मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली

                                       - अचलेय

No comments:

Post a Comment

शालिग्राम

 धोंडा ओबड धोबड  होतो गोल गुळगुळीत  परी नदीत बुडणे  आले पाहिजे नशिबी  नदीचा तो तळ  तेथे प्रवाह अथांग  ध्यान लागता धोंड्यास  होतो त्याचा शालि...