Monday, 7 May 2018

कधी डोळे मिटून चालून पहा

कधी डोळे मिटून चालून पहा
मान्य आहे तुम्ही थबकून चालाल
नको तिथे वळण घ्याल
वळणावरती सरळ जाल
नकळत कुणाला धक्का द्याल
कुणाचे खडे बोल ऐकाल
पण माफी मागून चालत राहाल
कुठे दगडावरती बोट ठेचाळाल
या मूर्खपणाला शिव्या द्याल
तरीपण कधी डोळे मिटून चालून पहा
मग तुम्ही कानांच्या आधीन व्हाल
सभोवतालच जग ऐकाल
गर्दी मध्ये गाड्यांचे आवाज
लांबून जवळ जवळून लांब
शेजारच्या जोडप्याचं गुलुगुलू ऐकाल
नळावरचं भांडण पण ऐकाल
कुणा छोटुल्याचा हट्ट ऐकाल
देवापुढले डीजे ऐकाल
आणि चौकात पोलिसाची
शिट्टी पण ऐकाल...
"ए हिरो, सिग्नल दिसत न्हाय?"
मग डोळे उघडून चालू लागाल
त्यापेक्षा कधी रानात डोळे मिटून पहा
इथे शुष्क पानांचा चरचराट ऐकाल
फळाफुलांचे गंध घ्याल
कधी तुम्ही मोगऱ्याच्या हद्दीत
तर कधी तुम्ही चाफ्याच्या सावलीत
पक्षांची किलबिल ऐकाल
ओढ्याची खळखळ ऐकाल
मनातल्या हाका ऐकाल
जागेपणीच स्वप्न पहाल
पण नकळत बाभूळीवर
पाय पण द्याल
अंधारले गुंते पण सोडवाल
अन बंद डोळ्यांनी जग पहाल
म्हणून म्हंटलं
कधी डोळे मिटून चालून 'पहा' !!!

                               ~ अचलेय
                               ( १८-एप्रिल-२०१८ )
कधी डोळे मिटून चालून पहा

ती एक उडी घ्यावीच लागते

ती एक उडी घ्यावीच लागते  दुर्गम पहाडात जन्मल्यावर  खडकात आदळण्याचा धोका पत्करून  सुसाट वारा लांबवर फेकू पहात असताना  पायथ्याला भिडणाऱ्या लाट...