Saturday, 2 December 2017

दसरा सकाळ



    एक अशीच सकाळ, सप्टेंबर महिना. सकाळी स्नान सुश्रूषा आटोपून नाटकाच्या तालमी साठी निघालो होतो. माझं राहणं काही दिवसांसाठी माझ्या आत्ये भावा कडे आंबेगावात होतं. गाडीवरून जुजबी कापड झटकून मी मुख्य रस्त्याकडे निघालो होतो. मुख्य रस्ता आणि आमचं घर यांना जोडणारा रस्ता हा सिंहगड कॉलेज च्या कॅम्पस मधून जाणारा होता. तो पण बरोब्बर कॉलेज च्या हद्दीमध्ये सुदृढ होता आणि ही हद्द संपल्यावर पुढे अगदीच खडतर होता. येथे कधी काळी चांगला रस्ता असावा पण त्याला गाडण्यासाठीच जणू आंबेगाव ग्रामपंचायतीने त्यावर दगड, माती, मुरूम यांचा बिछाना अंथरला असावा. तर अश्या या रस्त्यावर धूळ उडवत जाणाऱ्या गाड्यांमधून माझी दुचाकी मी खड्डे चुकवायचा प्रयत्न करत, कशीतरी रेटत आणि धुळीपासून वाचण्यासाठी डोळे मिचमीचात मी पुढे जात होतो. कॉलेज हद्दीच्या मी १०० मीटर पुढे आलो असेल तेवढ्यात रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या एका आजोबांनी मला हाक दिली आणि हात दाखवला. तसा मी गाडी थांबवली आणि त्यांच्याकडे पाहू लागलो तर ते म्हणाले, " मला मेन रोड पर्यंत सोडता का हो ? तिकडे मला टमटम मिळेल. पायी चालणं जरा जीवावर आलंय."
मी म्हंटलं," अहो बसा की आजोबा त्यात काय?चला कुठे जायचंय तुम्हाला ?"
तर ते म्हणाले,"मला शंकर महाराज मठात जायचं होतं."
त्यावर मी त्यांना म्हंटलं," अहो मला त्याच area मध्ये जायचं आहे. तर मी तुम्हाला KK Market पर्यंत सोडू शकतो."
ते म्हणाले,"ठीक आहे"  
         आणि आम्ही निघालो. तसा मी कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणार्यातला नाही. म्हणून हा मनुष्य माझ्या बॅग ची चेन तर नाही ना उघडत आहे म्हणून side mirror मधून मी त्यांच्याकडे नजर टाकली तर मला आजोबांचा चेहेरा दिसत होता. आजोबांनी दोन भुवयांच्या मध्यभागी अष्ठगंधाचा टिळा लावला होता. त्यांचे काळी झाक असलेले पांढरे केस त्यांनी तेल लावून चापून चोपून लावले होते. ओठांवर स्मित हास्य आणि त्यात त्यांचे लाल किनार असलेले सुबक दात दिसत होते. कदाचित आबांना काथ चुन्याचे पान खाण्याची सवय असावी. डोळ्यावर मेटल च्या दांडयांचा चौकोनी चष्मा आणि Nose-pad खराब झाल्या मुळे असावं किंवा काय असावं पण दोन काचांना जोडणाऱ्या दांडीवर पांढऱ्या सुती धाग्याने लपेटलेले होते. कधी काळी या फ्रेम ला सोनेरी मुलामा दिला होता अशी ती फ्रेम होतीअंगावर सफेद बुशकोट आणि हातात एक टिफिन बॅग असा सगळा त्यांचा पेहेराव होताएकूणच कृष्ण वर्ण असलेला हा देह सत्तर पंचाहत्तरीतला असावा असा मी अंदाज लावलामी आरश्यातून त्यांना न्याहाळतोय हे लक्षात आल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली.
"तुम्ही काय करता ? नोकरीला आहात का ?"
"अहो नाही, सध्या मी अभिनय करतो. त्याच्याच तालमी साठी तिकडे जातोय.तुम्ही कुठे निघालात? दर्शनाला का ?"
"हो दर्शन तर घ्यायचेच आहे.. आपलं चप्पल स्टँड आहे तिथे.. ३० वर्ष झालीत चालवतोय मी.. आज दसरा आहे ना.. गर्दी असेल आज म्हणून जरा लौकरच निघालोय."
मग मला साक्षात्कार झाला की आज बहुतेक सर्व गाड्या स्वच्छ धुतलेल्या दिसत होत्या आणि अनेक गाड्यांवर झेंडूचे पिवळे हार चढले होते. तोच विचार मी करत होतो की आज रस्त्याच्या कडेला फुलांचे स्टॉल का लागले आहेत? आणि मग मला हे पण आठवलं की मला कालच आईने उद्या दसरा असल्याचं सांगितलं होतं. मी हा असा वेंधळा आहे. असो, तर मी आजोबांशी बोलू लागलो,"काय म्हंटलं तुम्ही चप्पल स्टँड काय?"
"अहो आपलं चप्पल स्टँड आहे म्हंटलं मी! आज गर्दी असेल ना मंदिरात..म्हणून लौकर जावं म्हंटलं."
    चप्पल स्टँड नाव ऐकल्यावर माझं लक्ष आजोबांच्या पांढऱ्या बुशकोटात लपलेल्या खाकी शर्टकडे गेलं. आजोबांनी गणवेश खराब होऊ नये म्हणून पांढरा शर्ट त्यावर चढवला होता कदाचित.मला त्यांच्या त्या निरागस चेहेऱ्या कडे बघून उगाच माझ्या आजोबांची आठवण झाली आणि मग त्यांच्याबद्दल मनात एक soft corner निर्माण झालामी पुन्हा एकदा बोलायला सुरुवात केली," अच्छा अच्छा.. छान छान.. या वयात किती कष्ट घेता तुम्ही आजोबा ?"
"अहो कष्ट बिष्ट काही नाही. घरी करमत नाही म्हणून जातो. देवाच्या कृपेने कसं सगळं सुखवस्तू लाभलंय मला. एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. मुलाने ITI करून छान कंपनीत नोकरी मिळवली आहे. आधी आम्ही इकडेच राहायचो बालाजी नगर मध्ये मठाच्या जवळ. पण तेव्हा कसं भाड्याची खोली होती. आता मुलगा कमवता झाल्यावर त्याने इथे स्वतःचा रूम किचन फ्लॅट घेतलाय वर्षां आधी.मुलाला एक मुलगा एक मुलगी आहे. हो आणि मुलीला पण एक मुलगा एक मुलगी आहे. जावई चांगला सज्जन माणूस आहे. आणि हो, माझी चारही नातवंड इंग्रजी शाळेत शिकतात बरं!  सगळी काशी त्याची कृपा आहे. तो वरून बघत असतो हो.आपण आपलं काम जर सचोटीने करत असलो तर तो पण आपल्याला चांगलं आयुष्य देतो.माझं आयुष्य हे असं लोकांच्या चपला-जोडे मोजण्यात आणि वेचण्यात गेले तर त्यानेही माझ्या आयुष्याच्या उत्तरार्धात मला हे अशे सुखी क्षण वेचायला दिले आहेत."
    खरच आयुष्यभर लोकांच्या चपलांवरच्या धुळीने आपले हात माखून घेणाऱ्या त्या आजोबांचे हृदय हे देवळाच्या गाभाऱ्या पेक्षा मला जास्त पवित्र वाटत होते.लोकांचे देह देवळात आणि चित्त खेटरात होऊ नये म्हणून स्वतःचे चित्त त्यांच्या खेटरात गुंतवणाऱ्या त्या आजोबांचे मला फारच कौतुक वाटत होते. मी त्यांना विचारलं," काहो पण मठ वाले किती पैसे देतात तुम्हाला ?"
"अहो, तशी पाहता मला आता पैश्याची काहीच आवश्यकता आणि कमवण्याची इच्छा नाही. मुलगा चांगला कमवतो माझा. तरीपण स्टँड समोरच्या डब्यात लोकं स्वेच्छेने जे काही पैसे टाकतात त्यातला एक वाटा मला मिळतो. मी तो वाटा माझ्या नातवंडांच्या शिक्षणासाठी माझ्या मुलाला आणि मुलीला देतो. आमच्या मालकीण बाईंना वैकुंठात जाऊन आता एक तप उलटलंय. तिच्या नशिबी एकाही नातवंडाचं सुख नाही आलं. ती जर आज असती तर तिने पण मला कपडे आणि खेळण्यांपेक्षा, शिक्षणावर खर्च करण्याचा सल्ला दिला असता.चला मी काय बोलत बसलो.. आला KK Market चा सिग्नल. चला मी इथेच उतरतो." आणि मी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली.गाडीवरून टूमकिनी उतरून आजोबा पुन्हा म्हणाले," या बरं तुम्ही नक्की वेळ मिळाला की दर्शनाला. आज दसरा आहे !" "हो हो येतो नक्की" "चला धन्यवाद. राम राम.."
"अहो धन्यवाद काय.. चला bye आणि happy dasara"
आजोबा गालातल्या गालात गोड हसले आणि आपल्या वाटेला मार्गस्थ झाले. मी बराच वेळ त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होतो. काही लोक हे असे एकदाच भेटतात. पुन्हा कधी भेटण्यासाठी, चार वाक्यातच भलं मोठं तत्त्वज्ञान सांगून जातात आणि तेवढ्यातच आपल्या हृदयात आपली एक जागा ही अशी पक्की करून जातात.


                                                               नचिकेत अभय गद्रे कृत .  

12 comments:

  1. अर्थपूर्ण ! आणि शब्दांची मांडणी उत्कृष्ट!

    ReplyDelete
  2. अर्थपूर्ण ! आणि शब्दांची मांडणी उत्कृष्ट!

    ReplyDelete
  3. साध्याच प्रसंगाची छान मांडणी! असेच प्रसंग आपलं जगणं समृद्ध करत असतात. अनुभव घेत रहा आणि लिहीत रहा...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर.. मी तुच्याच अभिप्रायाची वाट पाहत होतो. हो माझा प्रयत्न तर तोच राहणार आहे.

      Delete
  4. Hats off to the writer !!!! मी फार क्वचित लेख पूर्ण वाचते आणि यातला विषय माझ्या साठी मनोवेधित होता ।
    But missing my grandfather who loved me a lot and completed my all wishes 😓

    ReplyDelete
    Replies
    1. आभारी आहे..!! 😅😅 आपले आजी आणि आजोबा हे प्रत्येका साठी खूप स्पेशल असतात. आपल्या मनाचा ते सॉफ्ट कॉर्नर असतात...

      Delete

शालिग्राम

 धोंडा ओबड धोबड  होतो गोल गुळगुळीत  परी नदीत बुडणे  आले पाहिजे नशिबी  नदीचा तो तळ  तेथे प्रवाह अथांग  ध्यान लागता धोंड्यास  होतो त्याचा शालि...